Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पंतप्रधान किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ दयावा - आ.सत्यजीत तांबे यांची मागणी.

पंतप्रधान किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ दयावा - आ.सत्यजीत तांबे यांची मागणी

सन्मान’ योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची वसुली आणि ‘नमो’तील अपात्र शेतकऱ्यांची सरकारकडून माहिती

गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार ६४५ शेतकरी अपात्र, दीड हजारांहून अधिक लाभार्थ्यांची जमीनच नसल्याची माहिती

               आमदार सत्यजित तांबे
मुंबई - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे निकष नमो शेतकरी महासन्मान योजनेला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ७१ लाख शेतकऱ्यांपैकी निकषांची पूर्तता होत नसल्याने ३२ लाख ३७ हजार शेतकरी पहिल्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत,’’ अशी माहिती राज्य सरकारने आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात विधानपरिषदेत दिली.

‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ आणि ‘नमो’ योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत आ. सत्यजीत तांबे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ‘सन्मान’ योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची वसुली आणि ‘नमो’तील अपात्र शेतकऱ्यांची माहिती देण्यात आली.

नमो पेन्शनमध्ये कोल्हापुरातील तब्बल १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता
राज्यातील ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत १ हजार ५५४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार आजपर्यंतच्या पडताळणीत गोंदिया जिल्ह्यातील पाच हजार ६४५ शेतकऱ्यांना अपात्र ठरविले. दीड हजार लाभार्थ्यांची जमीनच नाही.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याची तरतूद असताना राज्यातील ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १५५४ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची बाब माहे मे, २०२३ मध्ये निदर्शनास आली आहे का, असा प्रश्न  आ. तांबे यांनी उपस्थित केला. 

यासंदर्भात झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार आजपर्यंत केलेल्या पडताळणीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार ६४५ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले असून दीड हजारांहून अधिक लाभार्थ्यांची त्या भागात जमीनच नसल्याचे दिनांक २० मार्च, २०२३ रोजी निदर्शनास आले. या अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कम वसूल करण्याबाबत कृषी विभागाने आदेश दिले असून खात्यातून रक्कम काढून घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर थकबाकीची नोंद करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे का, असा प्रश्न आ. तांबे यांनी विचारला. 

त्यामुळे ही रक्कम वसूल करून अन्य शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर थकबाकी नोंद केली आहे. राज्यातील ७१ लाख लाभार्थी शेतकऱ्यांपैकी निकषांची पुर्तता न करणाऱ्या ३२ लाख ३७ हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत, हे खरे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज्य सरकारने हे अंशतः: खरे असल्याची माहिती उत्तरात दिली. 

 ‘नमो शेतकरी सन्मान’साठी चार हजार कोटींची तरतूद
‘शेतकरी सन्मान’च्या मार्गदर्शक सूचनांमधील अपात्रतेच्या निकषानुसार राज्यात १४ लाख २८ हजार अपात्र लाभार्थ्यांकडून १ हजार ७५४. ५० कोटी रुपयांची रक्कम वसूलपात्र आहे. यापैकी १ लाख ४ लाभार्थ्यांकडून ९३.२१ कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे.

केंद्राने केलेल्या तपासणीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील २७ हजार ५९९ लाभार्थ्यांपैकी १५ हजार २५९ लाभार्थ्यांच्या तपासणीअंती एकूण १४४८ लाभार्थी अपात्र ठरले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची तपासणी करणे अजून बाकी आहे.

राज्यातील ९७. ६५ लाख पात्र लाभार्थ्यांपैकी ९५. २७ लाख लाभार्थ्यांच्या भूमि अभिलेख नोंदी ‘शेतकरी सन्मान’च्या पोर्टलवर अद्ययावत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित २. ३९ लाख लाभार्थ्यांच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, असे राज्य सरकारने उत्तरात स्पष्ट केले.

योजनेच्या लाभासाठी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, eKYC प्रमाणिकरण व बँक खाती आधार संलग्न करणे या बंधनकारक बाबींची पुर्तता न केल्याने राज्यातील अपात्र लाभार्थीच्या संख्येत व वसूल करावयाच्या रकमेत वाढ झालेली आहे. अपात्र लाभार्थीना अदा झालेल्या लाभ परताव्याची महसूल विभागाकडून नियमोचित वसूली करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement