Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मालाड आगीत, शेकडो घरांना व कुटुंबाना बेचिराख करणा-या, आगीचा आँखो देखा हाल...फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत असलेले व मालाड आप्पापाडा झोपडपट्टी परिसरात लागलेली आग विझवण्यात सहभागी असलेले, विनायक वसंतराव देशमुख, यांचे कडुन आगीचा आँखो देखा हाल...

बेचिराख..
रहदारीच्या रस्त्यातून वाट काढत, सायरन आणि हुटरचा आवाज करत  विक्रोळी अग्निशमन केंद्राचे फायर इंजिन मालाडच्या दिशेने धावत होते. मालाड पूर्वेला आप्पा पाडा येथे झोपडपट्टीला आग लागल्याचा कॉल मिळाला होता. मी आणि दिलीप कुंजाम गाडीवर बसलो होतो. हिरानंदानी इस्टेट गेल्यावर गाडी विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडला आली. रहदारी असली तरी अग्निशमन दलाच्या गाड्यांना मुंबईचे सुज्ञ नागरिक वाट करून देतात हा अनुभव आहे. लेव्हल दोन वर्दी दिल्यामुळे आणि पश्चिम उपनगरातील बहुतेक अग्निशमन वाहने जोगेश्वरी येथे अनेक फर्निचरची दुकने तसेच लाकडाच्या गोदामांना लागलेली लेव्हल तीन ची आग विझविण्यात व्यस्त असल्याने शहर तसेच पूर्व उपनगरातील दूरवरून अनेक वाहने मालाडच्या कॉलवर पाचारण केली होती. 
सायंकाळी वेळ असल्यामुळे उजव्या बाजूला दिसणाऱ्या पवई लेकचे लावण्य खुलून आले होते. पवई लेक आणि उत्तरेला पसरलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.. खरोखरच त्या दृश्याने मन प्रसन्न होते. म्हणूनच आम्ही गाडीवर बसलो होतो. त्या विलोभनीय दृश्याने आम्ही कॉलवर निघालो आहोत हे क्षणभर विसरून गेलो. तेवढ्यात दिलीपने माझे लक्ष एका दृश्याकडे वेधून घेतले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आकाशात धुराचे काळेकुट्ट ढग पसरले होते. वळवाच्या पावसाचे आभाळ दाटून यावे तसे ते दृश्य! त्या लावण्याला जणू दृष्ट लागली. त्या दृश्याने मी भानावर आलो.
आम्हाला भयंकर प्रसंगाला तोंड द्यायचे आहे याचा अंदाज आला होता. रस्त्याच्या मधोमध मेट्रोचे काम सुरू होते. वाहनांसाठी ब्रीज आणि त्याच्या वरून भविष्यात मेट्रो धावणार होती. थोड्याच वेळात गाडी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागली. जसजसे आम्ही जवळ जात होतो तसतसे प्रसंगाचे गांभिर्य गडद होत होते. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रहदारीत इतर केंद्रातील अग्निशमन वाहने वर्दीचे ठिकाण जवळ करण्याचा प्रयत्न करत होती. जेवढ्या लवकर पोहोचू तेवढी पुढे गेलेल्या जवानांना लवकर मदत मिळणार होती. 
थोड्याच वेळात उजव्या बाजूला वळण घेऊन गाडी कुरार व्हिलेज पार करून एका टेकडीजवळ पोहोचली. कच्चा रस्ता असल्याने काही वाहने हळूहळू पुढे सरकत होती. रस्त्यावर हजारो लोक दिसत होते. आगीचा प्रसार झपाट्याने वाढल्यामुळे लेव्हल तीन वर्दी देण्यात आली होती. बारा फायर इंजिन आणि सहा वॉटर टॅंकर तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी पाचारण करण्यात आले होते.

तेवढ्यात...! एक व्यक्ती आमच्या गाडीस अडवून बाजूच्या एकदम अरुंद रस्त्याला नेण्यास सांगत होता. रस्ता खूपच अरुंद आणि खाच खळग्यांचा असल्याने एवढी मोठी गाडी आत घालणे अवघड आणि धोक्याचे होते. मात्र आम्ही तरीही पुढे जायला लागल्यावर तो माणूस गाडी पुढे झोपला. म्हणाला, गाडी माझ्या अंगावर घातली तरी मी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही!" त्या बाजूला अनेक झोपड्या जळत असल्याने तो तसे सांगत होता. त्याने भलामोठा दगड जवळ ठेवला होता.. आम्ही तरीही पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास कदाचित तो दगड त्याने गाडीवर भिरकावला ही असता. 
प्रसंगाचे गांभिर्य लक्षात घेऊन आमचे अधिकारी अढांगळे साहेब यांनी गाडी त्या छोट्या कच्च्या रस्त्यावर घ्यायला सांगितल्यावर यंत्रचालक अशोक बाळसराफ यांनी गाडी उजव्या बाजूला वळवली. आजुबाजुला काटेरी झुडपे आणि त्या अरुंद रस्त्याने गाडी हळूहळू पुढे सरकू लागली. एका ठिकाणी तो रस्ता संपला होता. दिंडोशी केंद्राची गाडी अगोदरच तिथे पोहोचून दूरवर जळत असलेल्या झोपड्या विझवायला सुरूवात केली होती. पहिल्या मार्गाने पुढे गेलेल्या गाड्यांच्या ही अनेक पाण्याच्या लाइन सुरू होत्या. तरीही आम्हाला अजून नक्की किती झोपड्यांना आग आहे हे लक्षात येत नव्हते.
मात्र आमच्या गाडीच्या होजची लाइन करताना ध्यानात आले.. तिथून बरेच पुढे आग लागली होती. मग मात्र आम्ही विलंब न करता गाडीतील सर्व होज काढून जोडत पुढे निघालो. आणि ते दृश्य दिसले. हजारो झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले होते. हजारो स्त्रिया, पुरूष आणि लहान मुले आमच्या झोपड्या वाचवा म्हणून टाहो फोडत होती. काळीज चर्र करणारे ते दृश्य! आम्ही अग्निशमन सुरू केले. 
मुळात डोंगर उतारावर असलेल्या त्या झोपड्या लाकडे, प्लॅस्टिक आणि पत्र्याच्या भिंती असलेल्या. जळाऊ सामान भरपूर असल्याने होळी पेटल्या सारखा.. जंगलात वणवा जसा वेगाने पुढे सरकतो तसं हजारो झोपड्या गिळंकृत करत पुढे सरकत होता. जवळपास चारी बाजूंनी आगीवर आक्रमण सुरू झाले असले तरी.. अगदी अल्पावधीतच हजारो झोपड्या खाक झाल्या होत्या. आम्ही आग विझवत पुढे सरकत होतो. हळूहळू सर्व शांत होत गेलं. तिथे पोहोचण्यात अत्यंत अडचण असल्याने अनेक संसार उध्वस्त झाले होते. आग विझवत पुढे जाताना अंधार पडल्याचे ही ध्यानात आले नाही. एखादं गाव वणव्यात खाक होऊन सगळीकडे चिता पेटाव्यात तसं.. स्मशान झालं होतं. 
संपूर्ण जळून राख झाली असली तरी काही वाचले असेल म्हणून सगळे आपापल्या झोपडीच्या जागेवर काही किमती ऐवज मिळतो का हे शोधत होते. विशेष म्हणजे सगळी मराठी माणसं..! 
कित्येक वृद्ध स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या. "आगं मावशी सगळ्यांचं घर जळून गेलं आहे. सगळ्यांबरोबर काय होईल ते होईल! कशाला रडतेस?" सांत्वनाचे हे शब्द ऐकून काळीज पिळवटून निघत होतं.

रात्री अकरा वाजले तरी धुमसणारी आग आम्ही शांत करत होतो. कोण म्हणत होतं दोन हजार.. कोण म्हणत होतं चार हजार..! उशिरा काही सामाजिक कार्यकर्ते डाळ, भात, पाणी घेऊन आले. दिवसभर उपाशी असलेल्या त्या दु:खीतांनी पोटाची खळगी भरण्यासाठी तिथे गर्दी केली. अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे दुसरे काहीच उरले नव्हते. तरीही ती मराठी माणसं नम्र होती. अग्निशमन दलाप्रति त्यांच्यातील कृतज्ञता भाव स्पष्ट दिसत होता. 
दुपारी घरातून जेवण करून ड्युटी साठी निघालेले आम्हीही उपाशी होतो. मात्र तिथल्या आक्रोशाने आमची भूक मेली होती. दोनतीन तरूण आमच्यासाठी पाणी, चहा आणि बिस्किटचे पुडे घेऊन आले. त्यांच्या सोबत एक आठदहा वर्षे वयाचा मुलगा होता. थकून मी एका दगडावर बसलो होतो. माझ्याकडे येऊन म्हणाला, "दादा बिस्किट घ्या.. किती वेळ तुम्ही आग विझवताय! दुसरा तरूण म्हणाला, "या आगीत त्याचीही झोपडी जळाली आहे!" ऐकूनच मला गलबलून आलं. कपडे, संपूर्ण अंग घाणीने माखलेले असताना, काही खाण्याची इच्छा नसतानाही मी त्याने दिलेला बिस्किटचा पुडा घेतला. एवढी मोठी दुर्घटना.. पण त्या एवढ्याशा पोरात केवढं मोठं धारिष्ट्य! 

इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणारी ग्रीन नेट एका साधारण सपाट जागेवर अंथरून सर्वांची झोपण्याची व्यवस्था केली होती. बहुतेक जण झोपी गेले असताना अचानक ढगांचा गडगडाट झाला. पावसाचे थेंब पडायला लागले. आगीमुळे प्रचंड धास्तावलेले सगळे पुन्हा आसरा शोधण्यासाठी इकडे तिकडे धावायला लागले. यात सर्वाधिक हाल झाले होते लहान मुलांचे. त्यांच्या प्रारब्धाचा पाठलाग संपला नव्हता...

या दुर्घटनेत एका बारा वर्षांच्या मुलास मात्र जीव गमवावा लागला होता. झोपडपट्टीत असलेली सर्व झाडे जळून खाक झाली होती. कित्येक डुकरे आगीत मेली होती. कित्येक सिलेंडर ब्लास्ट झाले होते. 

आजुबाजुला टोलेजंग इमारती आणि पूर्वेला घनदाट जंगल.. मधोमध ही झोपडपट्टी. त्या सर्व झोपड्या हे वन जमिनीवर उभ्या असणार हे स्पष्ट दिसत होतं. परंतु व्होट बँक करण्याच्या उद्देशाने अशा लोकांना कदाचित अवैध राहण्यास प्रवृत्त केले जात असावे. अशा गोरगरीबांना काय हवं असतं? पाणी, विज मिळाल्यावर मोलमजुरी करुनही पोट भरतं. मात्र अशी दुर्घटना घडते तेव्हा संसार उध्वस्त होतो. अशा प्रकारे पुर्वी ही दुर्घटना घडल्याचे ऐकायला मिळत होते. म्हणजे दुर्घटना घडू शकते हे माहीत असूनही त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. 
असो.. मला आणखी वादग्रस्त विषयात पडायचे नाही. मात्र हा एक विलक्षण अनुभव होता हे मात्र नक्की.. आमचे रिलिव्ह आल्यावर रात्री तीन वाजता आम्ही आमच्या केंद्रात परतलो. 
     मुंबई फायर ब्रिग्रेड मध्ये कार्यरत असलेले,विनायक वसंतराव देशमुख हे मुळचे सातारा जिल्हातील पाटण तालुक्यातील चाफळ येथील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement