Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पुस्तक लिहून व्यक्त केली वडिलांप्रती कृतज्ञता.

पुस्तक लिहून व्यक्त केली वडिलांप्रती कृतज्ञता

तळमावले - (पाटण ) 
आपल्या आई-वडिलांचे ऋण आपण आयुष्यामध्ये कधीही फेडू शकत नाही इतके ते अनंत असतात. परंतू त्यांच्या प्रती आपण काही अंशी कृतज्ञता व्यक्त करु शकतो. ‘तात्या’ हे पुस्तक लिहून दिवगंत वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे.
डाॅ.डाकवे यांचे वडील अचानक गेल्यानंतर त्यांनी वडिलांबद्दलच्या आठवणी लिहल्या आहेत. त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींचे, स्वभाव वैशिष्ट्याचे आणि त्यांच्या विविध कलागुणांचे अचूक चित्रण शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
काळजाला हात घालणारे शब्द, ग्रामीण भाषेचा बाज असलेले हे पुस्तक आहे. स्पंदन प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून डाॅ.संदीप डाकवे यांचे हे 10 वे पुस्तक आहे. सुप्रसिध्द विचारवंत व व्याख्याते डाॅ.यशवंत पाटणे यांनी या पुस्तकाची आशयघन अशी प्रस्तावना लिहली आहे. यात ते म्हणतात, ‘तात्या’ हा चरित्रग्रंथ म्हणजे संदीपने पुस्तकाच्या पालखीतून काढलेली अक्षरांची तीर्थयात्राच आहे. तात्या कुटुंबवत्सल गृहस्थ होते. ते संदीपच्या कुटुंबातील सर्वांसाठी कष्टाचे संस्कारपीठ होते. ‘संदीप’ या नावात प्रकाश आहे. त्यांच्या पुस्तकामुळे अनेकांसाठी अज्ञात असणारे परोपकारी तात्या प्रकाशात आले आहेत. एकापरीने त्यांनी आपल्या जन्मदात्या पित्याला पुस्तकाच्या कोंदणात सन्मानाने प्रकाशमान करुन आपले नाव सार्थक केले आहे.
हे पुस्तक उपेक्षित शेतकरी वर्गाचं नेतृत्व करणाऱ्या आणि आहे त्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकताना आपल्या मुलांना एक मार्गदर्शक बनून त्याला उत्तमातील उत्तम ‘माणूस’ म्हणून घडवण्यासाठी सतत मार्गदर्शन करणाऱ्या एका बापाची कहाणी आहे.
पुस्तकामध्ये प्रत्येक लेखाला साजेसे असे आकर्षक चित्र लेखक डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटले आहे. मुखपृष्ठ व आतील रंगीत पाने यांची मांडणी कलाशिक्षक व कॅलिग्राफी आर्टीस्ट बाळासाहेब कचरे यांनी तर मुखपृष्ठावरील चित्र प्रा.सत्यजित वरेकर यांनी केले आहे.
नेहमीच्या पुस्तकापेक्षा वेगळया आकारात साकारलेले पुस्तक वाचकांना नक्कीच भावेल. याशिवाय कवी तुळशीराम सुतार यांनी तात्यांचा संपूर्ण जीवनपट व्यक्त करणारी कविता लिहली आहे. अशा ‘तात्या’ या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार असल्याची माहिती लेखक डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement