पाटण पोलिसांची मोठी कारवाई! पवनचक्कीतील तांब्याची केबल चोरी उघड; 4 आरोपी अटकेत, 1.40 लाखांचा मुद्देमाल जप्त...
आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल - पाटण, दि. 31 : पाटण तालुक्यातील डोंगर पठारावरील पवनचक्क्यांमधून तांब्याच्या तारा असलेल्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पाटण पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई करत ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनचक्की केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 1 लाख 40 हजार रुपये किमतीची तांब्याची केबल जप्त करण्यात आली आहे.
पाटण तालुक्यातील डोंगराळ पठारावर मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारा असलेल्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या चोरीबाबत पाटण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्यानंतर गुन्हे नोंद करण्यात आले होते.
पाटण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करून चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला. या तपासादरम्यान ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला पवनचक्की केबल चोरीचा गुन्हाही उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणात रुपेश दिलीप पाटील (रा. पोतले, ता. कराड), राहुल दादासो कदम (रा. वडगाव, ता. कराड), अनिल यशवंत सुतार (रा. सुतारवाडी, सणबूर, ता. पाटण) आणि संतोष शामराव सरगर (रा. पाण्याच्या टाकीजवळ, चिखली, ता. कराड) यांना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींनी उधवणे, ता. पाटण येथील पवनचक्कीमधून तांब्याची केबल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 37/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय विद्युत कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण विभाग सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण यांच्यासह संजय राऊत, आनंदा आव्हाड, पोलीस हवालदार वैभव पुजारी, उमेश मोरे, अमृत आळंदे, दादासो लोंढे, आबासाहेब गलांडे, संतोष माने, संतोष कुचेकर, शरद गुरव, राजेंद्र मोहिते, हणमंत नलवडे, केतन नाकाडे आणि आशिष कांबळे यांनी सहभाग घेतला.


0 टिप्पण्या