Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


श्रावण भजन महोत्सव 2026 : प.पू. गगनगिरी मठ पाटण येथे 51 भजनी मंडळांचा भक्तिरसात जागर...

भजन महोत्सवात मान्यवर व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग...

प. पू. गगनगिरी मठ, पाटण येथे भक्तिरसात न्हाऊन निघाला श्रावण भजन महोत्सव...

आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - चंद्रकांत सुतार | पाटण प्रतिनिधी : श्रावणाच्या पवित्र मासात विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाची साथ आणि संतांच्या अभंगांची बरसात... अशा भक्तिमय वातावरणात प. पू. गगनगिरी मठ, पाटण येथे रामकृष्ण हरी भजन प्रसारक संस्थेच्या वतीने आयोजित श्रावण भजन महोत्सव–२०२६ उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला.

या महोत्सवात पाटण तालुका व शहर परिसरातील सुमारे ५१ भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भजनी मंडळांच्या सहभागामुळे गगनगिरी मठाने जणू पंढरीचेच रूप धारण केले होते. श्रावण महिन्याचे औचित्य साधून समाजात अध्यात्म, संस्कार आणि भक्तिभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


रामकृष्ण हरी भजन प्रसारक संस्थेचा हा पहिलाच श्रावण भजन महोत्सव असून, सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांप्रमाणे पाटण तालुक्यातील विविध गावांमध्ये श्रावण महिन्यात ३० दिवस भक्तीचा जागर सुरू आहे.

महोत्सवात सहभागी विविध भजनी मंडळांनी पारंपरिक वेशभूषेत संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचे सादरीकरण केले. विठ्ठल नामाचा जयघोष, गवळणी तसेच टाळ-मृदंग, वीणा, तबला आणि पखवाजाच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

या वेळी महोत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक भजनी मंडळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायण ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सदस्यांना प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास विश्वस्त अध्यक्ष अभय क्षिरसागर, विश्वस्त उपाध्यक्ष उद्धव पाटोळे, विश्वस्त सुरेश कदम, सुभाष चव्हाण, रामकृष्ण हरी भजन प्रसारक संस्था, सातारा शाखा पाटणच्या तालुका महिला अध्यक्षा सौ. मनिषाताई वाडेकर, सौ. पानवळ मॅडम आणि सौ. खांडके मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सहभागी भजनी मंडळांना गाथा ग्रंथ व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अन्नदाते प्रकाश जाधव गुरुजी आणि सागर जमदाडे यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थित मान्यवर व भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा श्रावण भजन महोत्सव भक्तिमय आणि संस्मरणीय ठरला.

ही माहिती रामकृष्ण हरी भजन प्रसारक संस्था, सातारा शाखा पाटणचे कार्यवाहक व प्रसिद्धी प्रमुख मा. पुरुषोत्तम वाडेकरमा. चंद्रकांत सुतार यांनी पाटण तालुका महिला अध्यक्षा सौ. मनिषाताई वाडेकर आणि निरपेक्ष सेवा कीर्तनकार भरत पाटील यांच्या परवानगीने जाहीर केली.

संपादक - संजय डुबल 

917283079

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement