कलाक्षेत्रातील दिग्गजांचा गौरव; 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे दिमाखात वितरण...
मुंबई, आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल - दि. 9 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे दिमाखात वितरण करण्यात आले. चित्रपट आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांच्या उल्लेखनीय योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.
प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2025, तर अभिनेते प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला असून, त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी हेलन खान यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग आणि ओव्यांमधून त्यांनी अभिजात संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘शिवकल्याण राजा’ या संगीत अल्बमच्या माध्यमातून त्यांनी अजरामर कार्य केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्या लेखणीने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडवून आणल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अँग्री यंग मॅन’ ही प्रतिमा घडविण्यात त्यांच्या लेखनाचे मोठे योगदान आहे. ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’ यांसारख्या चित्रपटांतील पात्रे आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
अभिनेते प्रसाद ओक यांचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी कलाक्षेत्रातील ‘360 डिग्री मॅन’ असा केला. ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचेही कौतुक करण्यात आले.
अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी विविध भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः स्त्रीकेंद्री भूमिकांमधून त्यांनी वास्तववादी आणि प्रभावी अभिनयाची छाप पाडल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी उत्तम सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याबरोबरच चित्रनगरी नव्या स्वरूपात विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमी ही सर्वोत्तम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यास विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मंत्री ॲड. आशिष शेलार, दिग्दर्शक किरण शांताराम तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त मान्यवर : 🏆 राणी मुखर्जी – स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2025
🏆 प्रसाद ओक – चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2025
🏆 सलीम खान – स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2025
🏆 पं. हृदयनाथ मंगेशकर – चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2025


0 टिप्पण्या