‘गोंधळ’ची ऑस्करवारी! मराठी चित्रपट ठरला भारताची अधिकृत प्रवेशिका...
मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - ( संजय डुबल ) १८ सप्टेंबर २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर २०२७) भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी मुंबईत ही घोषणा केली.
सदर चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या श्रेणीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ‘गोंधळ’ हा ऑस्करसाठी भारताकडून निवडला जाणारा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी ‘श्वास’ (२००५), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) आणि ‘कोर्ट’ (२०१५) या मराठी चित्रपटांची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली होती.
या चित्रपटाने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतले आहे. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संतोष डावखर यांना सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला होता.
‘गोंधळ’च्या कलाकारांमुळेही ऑस्करवारीला रंगत;
‘गोंधळ’ या मराठी चित्रपटात किशोर कदम इशिता देशमुख योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, कैलास वाघमारे, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे, शरद जाधव, विठ्ठल काळे, प्रवीण डाळिंबकर आणि ध्रुव ठोके यांच्यासह अनेक कलाकार चित्रपटात सहभागी आहेत.
‘गोंधळ’चे लेखन आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले असून, संगीत पद्मविभूषण इलैयाराजा यांचे आहे. छायांकन अमलेंदू चौधरी आणि संकलन आशिष म्हात्रे यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला गोंधळ या मराठी चित्रपटाने आता ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रवेश केला आहे. ९९वा ऑस्कर सोहळा १४ मार्च २०२७ संपन्न होणार आहे.


0 टिप्पण्या