जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धेतून कलेचा जागर
गणेशोत्सवाच्या कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक डिजिटल व्यासपीठ; विजेत्यांना लाखोंची पारितोषिके...
मुंबई: आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - १४ सप्टेंबर : गणेशोत्सवातील कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ‘जागर कलेचा, समृद्ध परंपरेचा..!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली आहे.
ही स्पर्धा १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम रीलसाठी १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पाच कला विभागांमध्ये स्पर्धा
स्पर्धेचे स्वरूप पाच विविध कला विभागांमध्ये करण्यात आले आहे.
१. नैवेद्य आणि परंपरा :
गणेशोत्सवातील पारंपरिक नैवेद्य, पदार्थ, विविध प्रदेशांच्या खाद्यपरंपरा आणि कौटुंबिक खाद्यपरंपरांचे सर्जनशील सादरीकरण करता येणार आहे.
२. गणराज रंगी :
गायन, नृत्य, वाद्यसंगीत, संगीत नाट्य, लोकनाट्य, दशावतार, नमन खेळे आणि विविध पारंपरिक लोककलांचा या विभागात समावेश आहे.
३. कलाधिपती गणपती :
चित्रकला, रेखाचित्र, शिल्पकला, रांगोळी, चित्रांकन आदी दृश्यकला प्रकार सादर करता येतील.
४. शब्दसुमनांकित गणराय :
कविता, कथा, निवेदन, प्रवासवर्णन, सांस्कृतिक कथन, गणपती मंदिरे, गणेशस्थळे, लोककथा आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधित अनुभव सादर करता येणार आहेत.
५. AI मधून गणपतीचे नवदर्शन :
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विविध कला प्रकारांचे सर्जनशील पुनर्सादरीकरण करता येणार आहे. AI-निर्मित किंवा AI-सहाय्यित सामग्री केवळ या विशेष विभागात स्वीकारली जाणार आहे.विभागनिहाय पारितोषिके
प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये, तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
रीलसाठी महत्त्वाचे नियम
स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारी रील उभी (9:16) आणि ३० ते ९० सेकंदांची असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी रील स्वतःच्या सार्वजनिक Instagram आणि Facebook अकाउंटवर पोस्ट करणे बंधनकारक आहे. Instagram पोस्टमध्ये फिल्मसिटी मुंबईच्या Instagram हँडलला Collab करणे आणि Facebook वर संबंधित अकाउंटला Tag करणे आवश्यक आहे.
Private अकाउंटवरील रील स्वीकारल्या जाणार नाहीत. एका वेळी स्पर्धकाला केवळ एका श्रेणीत सहभागी होता येणार आहे.
महाराष्ट्राबाहेरील तसेच भारताबाहेरील स्पर्धकांसाठी निवासाचा दाखला सादर करणे आवश्यक राहणार आहे.
स्पर्धकांनी सादर केलेल्या रीलशी संबंधित कोणत्याही आक्षेपाची जबाबदारी स्वतः स्वीकारणे आवश्यक असून, विजेत्या रील प्रकाशित करण्याचे अधिकार महामंडळाकडे राखीव राहतील. स्पर्धेच्या नियमांमध्ये ऐनवेळी बदल करण्याचा अथवा स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहणार आहे.
सहभागी होण्याचे आवाहन
गणेशोत्सवातील कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचविण्याची संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध झाली आहे. इच्छुक कलाकार, छायाचित्रकार, व्हिडिओ निर्माते, कलावंत आणि सर्जनशील तरुणांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे अंतिम नियम, प्रवेश प्रक्रिया आणि सविस्तर माहितीसाठी filmcityganeshareel.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
— आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
संपादक 9172830799 व्हाट्सअप


0 टिप्पण्या