आत्मशाहिरी : प्रेरणादायी मानवंदना
देशाच्या स्वातंत्र्याचा लढा क्रांतिवीर - स्वातंत्र्यसैनिकांनी लढला. हा प्रदीर्घ काळ चाललेला स्वातंत्र्य लढा - चळवळ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शाहीर मंडळी करीत होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर लोकहिताचे कार्यक्रम ; आणि प्रसंगी लोकजागृतीचे कार्यक्रम शाहिरांनी केले आहेत. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक झुंजार बाण्याचे दर्शन घडविणारे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती, मराठवाडा मुक्ती हे लढेही शाहिरांनी आपल्या लेखणी, वाणी आणि कृतीने गाजवले आहेत. ह्या शाहिरांमध्ये शाहीर आत्माराम पाटील (जीवनकाळ : ९ नोव्हेंबर १९२३ ते १० नोव्हेंबर २०१०) यांचे नाव नेहमीच आघाडीवर राहिले आहे. त्यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष (२०२३-२४) सुरू आहे.
जाहिरात
१९४२ ते २००२ असा ६० वर्षांचा भव्य कालपट आत्माराम पाटील यांच्या शाहिरीने गाजवला आहे. ह्यात आदिवासी जीवनाचा पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. जाती व्यवस्थेचा पसारा आहे. शिवकालाचे स्वराज्य दर्शन आहे. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच महाराष्ट्र व मराठी भाषेचा इतिहास आहे. चीन व पाकिस्तानच्या युध्दखोरीचा पंचनामा आहे. यासह रोजच्या घडामोडीचा वेध घेणारं वर्तमान आहे; तसेच त्याच्या परिणामांचे भविष्यही आहे; जे आज आपण अनुभवतो. त्यांची शाहिरी ५० वर्षापूर्वीच 'मानवाच्या चांद्र विजया'पर्यंत पोहोचली होती. 
जाहिरात
_जय हिंद जनार्दना, मला तुझ्या संवेदना!_
_तुझी कीर्ती आराधना, हीच जीवन साधना!!_
- ह्या अट्टाहासाने त्यांनी आपली शाहिरी सादर केली. या देशकार्याला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मानवंदना देण्यासाठी "आत्मशाहिरी" हे जीवन नाट्य ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव व हास्यसम्राट संतोष पवार सादर करतील. त्यामध्ये अजिंक्य लिंगायत, दत्ता ठुले, विवेक ताम्हणकर, निलेश जाधव हे शाहीर व त्यांचे सहकारी आत्माराम पाटील यांची गाणी सादर करतील ; तर शाहीरा इंद्रायणी आत्माराम पाटील व ज्येष्ठ शाहीर मधू मोरे हे आठवणींसह वयाच्या ८५व्या वर्षात आपल्या पहाडी आवाजात गीते सादर करतील. शाहीर अंबादास तावरे व साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ हे आत्माराम पाटील यांच्या शाहिरीचे सामाजिक योगदान सांगतील. ह्या प्रेरणादायी "आत्मशाहिरी"ची अनुभूती रसिक- प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने घ्यावे, असे आवाहन 'राज्य सांस्कृतिक कार्य विभाग' प्रधान सचिव विकास खारगे आणि 'राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय' संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
जाहिरात
जाहिरात 


0 टिप्पण्या