हास्यजत्रेच्या सृजन टीमला मोठा धक्का; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन...
मुंबई :आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -(संजय डुबल) महाराष्ट्रातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे रात्री झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.
त्यांच्या आकस्मिक निधनाने कलाक्षेत्रासह हास्यजत्रा टीम, मित्रपरिवार आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
विजय कुमार राख हे विनोदाची उत्तम जाण असणारे आणि ग्रामीण जीवनातील बारकावे आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडणारे मराठवाड्यातील होतकरू लेखक म्हणून ओळखले जात होते. ग्रामीण बोली, तेथील जीवनशैली, माणसांचे स्वभाव आणि दैनंदिन जीवनातील गंमतीदार प्रसंग यांचे अचूक निरीक्षण करून त्यातून विनोद निर्माण करण्याची त्यांची खास हातोटी होती.
लेखन क्षेत्रात आपल्या प्रतिभेच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होता. मात्र, ऐन तारुण्यात त्यांचे अकस्मात निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि कलाक्षेत्रावर मोठा आघात झाला आहे.
विजय कुमार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सृजन टीमलाही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत दुःख व्यक्त केले आहे.
“हास्यजत्रा टीम त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे,” अशा भावना व्यक्त करत विजय कुमार राख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विनोदाच्या माध्यमातून रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या या होतकरू लेखकाला ‘आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह’ परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली. 💐
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
संपादक
संजय डुबल
9172830799
9833829232


0 टिप्पण्या