Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


एक झपाटलेला प्रवास...

मुंबई -  मुंबई अग्निशमन दलाचे विक्रोळी अग्निशमन केंद्र! पूर्व उपनगरातील मध्यवर्ती केंद्र आणि प्रादेशिक समादेशन केंद्र (region -6) असल्यामुळे या केंद्रात अनेक अद्ययावत उपकरणे, यंत्रसामग्री आणि वाहने तैनात आहेत. मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरात कुठेही जेव्हा भयंकर दुर्घटना घडते तेव्हा या केंद्रातील आवश्यक अग्निशमन आणि विमोचन वाहने पाचारण केली जातातच. या केंद्रात मी एक तपाहून अधिक काळ कार्यरत आहे. अगदी पूर्वीपासून अनेक जवान आणि अधिकाऱ्यांनी या केंद्राला नावलौकिक मिळवून दिलेला आहे. या केंद्राच्या नावलौकीकात भर घालणारी ही घटना..
        मुंबई अग्निशमन दल या महाकाय शहरात घडणाऱ्या प्रत्येक दुर्घटनेचा सामना करत असते. दिवसेंदिवस या शहरात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षणात सुद्धा अमुलाग्र बदल होत असतात. मात्र या दलाचे जवान जीवघेण्या दुर्घटनांचा सामना करण्यासाठी एवढे कार्यक्षम, उत्साही कसे असतात? हा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडणे स्वाभाविक आहे. 
अग्निशमन दलात केवळ अग्निशमन प्रशिक्षण यावरच काम न करता जवानांना मानसिक सक्षम करण्यासाठी, त्यांना सतत उत्साही ठेवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. दैनंदिन परेड वगैरे सरावा बरोबरच प्रत्येक केंद्रात व्यायामासाठी अत्याधुनिक जिम आहेत. क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम यासारखे खेळ खेळले जातात. यासह अनेक मैदानी खेळांच्या वार्षिक केंद्रांतर्गत स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पर्धा म्हणजे चुरस! वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त होईपर्यंत.. म्हणूनच या दलाचे जवान उत्साही, तजेलदार असतात. 
          अधिक माहीतीसाठी whts करा.
        दरवर्षी पार पडणाऱ्या अग्निकवायत स्पर्धा हा सुद्धा याचाच एक भाग! अग्निशमन हा या दलाच्या कार्याचा गाभा असल्यामुळे कमीतकमी वेळात अग्निशमन आणि बचावकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. याच बचावकार्याचा मैदानी सराव, प्रात्यक्षिक म्हणजे या अग्निकवायत स्पर्धा. शहरात दिवसेंदिवस उत्तुंग इमारतींची संख्या वाढत आहे. आकाशाला भिडणाऱ्या इमारती उभ्या राहत आहेत. हा सर्व विचार करून जमिनीवरील आणि उंच इमारतीतील.. या दोन्ही प्रकारांचा अग्निकवायत प्रात्यक्षिकात समावेश केलेला असतो. त्याच या स्पर्धा. 
          अधिक माहीतीसाठी whts करा.
       पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकावा असं हे आग वेगाने विझविण्याचे हे थरारक प्रात्यक्षिक असते. प्रत्येक केंद्राचे क्रू (टीम) या स्पर्धेत सहभागी असतात. सुरूवातीला सुक्या स्पर्धेचा केंद्रात सराव सुरू होतो. त्यानंतर विभागवार उपउपांत्य फेरीत जिंकलेल्या संघांची भायखळा मुख्यालय मैदानात उपांत्य फेरी होते. अखेरीस दोन्ही प्रकारातील सहा सहा संघ अंतिम फेरीसाठी निवडले जातात. आता मात्र सुकी स्पर्धा नसते. पाण्याच्या टॅंक मधून प्रत्यक्ष पंपाच्या साहाय्याने दिलेले टार्गेट टिपणे.. हे प्रात्यक्षिक करणाऱ्या जवानांच्या वेगवान हालचाली.. होज घेऊन धावणे.. वाऱ्याच्या वेगाने शिडी चढणे.. टार्गेट टिपल्यावर त्याच वेगाने साठ किलो वजनाचा डमी खांद्यावरून खाली आणणे! आणि एकूणच काळजाचा ठोका चुकविणारे हे प्रात्यक्षिक. पाहताना वाटतं.. हा जवान खाली कोसळला तर? मात्र जवान सराईतपणे हे थरारक प्रात्यक्षिक करतात. एक प्रकारे तो आगीवर.. दुर्घटनेवर मिळविलेला विजय असतो.
          अधिक माहीतीसाठी whts करा.
          जवळपास दोन महिने सुरू असलेल्या मुंबई अग्निशमन दल वार्षिक अग्निकवायत स्पर्धा महापालिका उपायुक्त श्री पवार साहेब, प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री संजय मांजरेकर साहेब तसेच अनेक सेवानिवृत्त प्रमुख अग्निशमन अधिकारी, अनेक महापालिकातील मान्यवर अधिकारी, दलातील अधिकारी व जवान तसेच नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यालय भायखळा मैदानात आज पार पडल्या. भायखळा अग्निशमन केंद्राच्या मैदानाला जणू रणभूमी चे स्वरूप आले होते.
          अधिक माहीतीसाठी whts करा.
       विक्रोळी अग्निशमन केंद्राचे केंद्र अधिकारी श्री लिनेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने पंप ड्रिल प्रकारात प्रथम तसेच ट्रिपल एक्स्टेंशन लॅडर ड्रिल प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. अत्यंत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या त्यांच्या टीमला यावर्षीचा मुंबई अग्निशमन दलातील आदर्श संघ हा मानाचा पुरस्कार मिळाला. गेली बारा वर्षे मी विक्रोळी अग्निशमन केंद्रात कार्यरत आहे. बहुतेक वेळा इथली टीम या स्पर्धेवर आपले नाव कोरते. मात्र या वर्षी आमच्या टीमने पुरस्कारांची लयलूट केली. इतर अनेक केंद्रातील जवानांनी सुद्धा अग्निशमन दलाच्या शौर्य परंपरेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. आमच्या सर्व खेळाडूंनी कसून सराव केला होता. त्यांना मार्गदर्शन करणारे फायटर किशोर पाटील, दिलीपकुमार कुंजाम, मुरलीधर आंधळे यांचा तसेच केंद्रातील प्रत्येक जवानांचा हा विजय होता. 
सहा. आयुक्त श्री रमेश पवार साहेब यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रसंगी अनेक भयंकर दुर्घटनेत शौर्य बजावलेल्या अग्निशमन जवानांना महापालिका आयुक्तांच्या शौर्यपदकाने गौरविण्यात आले. पवार साहेब यांनी त्यांच्या मनोगतात दलाच्या एकूणच कार्याचा यथोचित गौरव केला. प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री संजय मांजरेकर साहेब यांनी विजेत्या जवानांचे अभिनंदन केले. श्री डी एस पाटील साहेब यांनी या सुंदर सोहळ्याचे सुत्रसंचलन केले. शेवटी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी श्री आंबुलगेकर साहेब यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केल्यावर राष्ट्रगीताने या दिमाखदार, थरारक सोहळ्याची सांगता झाली.
लेखक - विनायक देशमुख
         अधिक माहीतीसाठी whts करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement