Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आज ४ सप्टेंबरला सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध पुरस्कारांचे मुंबईत वितरण "गौरव महासंस्कृतीचा" नृत्य नाटिका, संगीत, हास्यविनोद कलाविष्कार सादरीकरणाचा सांस्कृतिक कार्यक्रम

आज ४ सप्टेंबरला सांस्कृतिक कार्य विभागातर्फे  विविध पुरस्कारांचे मुंबईत वितरण

  "गौरव महासंस्कृतीचा" नृत्य नाटिका, संगीत, हास्यविनोद कलाविष्कार सादरीकरणाचा  सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई- आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल ): सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कलाकारांना जीवनगौरव पुरस्कार व अन्य पुरस्कारांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. यंदा हा पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, मुंबई येथे बुधवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता आयोजित केलेला आहे. 

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 या कार्यक्रमांमध्ये ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०२४ हा ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांना प्रदान करण्यात येणार असून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०२४ हा विदुषी आरती अंकलीकर यांना, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०२४ हा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी  प्रकाश बुद्धीसागर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०२४  शुभदा दादरकर यांना तसेच तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला जीवनगौरव पुरस्कार २०२३ हा श्रीमती शशिकला झुंबर सुक्रे तर २०२४ वर्षाचा जनार्दन वायदंडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

याचबरोबर राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ मध्ये नाटक क्षेत्रासाठी श्रीमती विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत डॉ.विकास कशाळकर, लोककला क्षेत्रासाठी अभिमन्यू धर्माजी सावदेकर, शाहिरी क्षेत्रासाठी शाहीर राजेंद्र कांबळे, नृत्य क्षेत्रासाठी श्रीमती सोनिया परचुरे, कीर्तन समाज प्रबोधन क्षेत्रासाठी संजय नाना धोंडगे, वाद्य संगीत क्षेत्रासाठी पांडुरंग मुखडे, कलादान क्षेत्रासाठी  नागेश सुर्वे, तमाशा क्षेत्रासाठी कैलास मारुती सावंत, आदिवासी गिरीजन क्षेत्रासाठी  शिवराम शंकर घुटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

या समारंभाप्रसंगी "गौरव महासंस्कृतीचा" हा नृत्य नाट्यसंगीत हास्यविनोद कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजित परब, संज्योती जगदाळे, केतकी भावे - जोशी, अरुण कदम, श्याम राजपूत, भार्गवी चिरमुले, विकास पाटील आणि शाहीर शुभम विभुते यांच्यामार्फत सादरीकरण होणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.  
     सर्वांसाठी  हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement