Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


उर्साच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित आले हे प्रेरणादायी : तृप्ती देसाई

उर्साच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित आले हे प्रेरणादायी : तृप्ती देसाई

पाटण - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (प्रतिनिधी चंद्रकांत सुतार ) हुसैनी यांचा उर्स व छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केलेला महिलांची आरोग्य तपासणी कार्यक्रम प्रेरणादायी आहे. हे आरोग्य शिबीर खूप महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील महिला दुखणे अंगावर काढतात त्यासाठी त्यास अशी शिबिरे होवून जनजागृती झाली पाहिजे. या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न होतोय. उर्साच्यानिमित्ताने हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित आले ही प्रेरणादायी बाब असल्याचे प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केले.
    पाटण येथे पीर हजरत हुसैनी यांचा उर्स व छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी सोपान टोम्पे होते. यावेळी पीर हजरत शेख मोहम्मद खलील चिश्ती, तहसीलदार अनंत गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉ. संगीता यादव, आरोग्य अधिकारी डॉ. नागेश्वरन ननावरे, नगराध्यक्षा सौ. अनिता देवकांत, पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, अॅड. तेजस्विनी पाटील, बशीर खोंदू, आयेशा तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या, आजकालचे बाहेरील वातावरण आपण पाहतो आहे जाती, धर्म याच्यात जाणीवपूर्वक तेढ निर्माण केले जातात. पण आपल्याला शिकवणच अशी आहे हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई हम सभ भाई भाई. कुठे तरी काही तरी घडतं आणि कोणी तरी काही बोलते. आज या या उर्साच्यानिमित्ताने हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित आले आहेत. सर्वात जास्त सहनशक्ती महिलांकडे असते. कामात असताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत अंगावरच दुखणे काढतात. आता परिस्थिती बदलली असून दररोज वेगवेगळ्या आजारांची उत्पत्ती होत आहे आणि हे आजार शेवटच्या स्टेजला कळतात. तेव्हा आपल्याकडे वेळ नसतो. त्यामुळे महिलांनी सुरूवातीलाच आरोग्याची काळजी घेतली तर पुढील आजाराचा सामना करावा लागणार नाही. त्यासाठीची जनजागृती झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
      प्रांताधिकारी सोपान टोम्पे म्हणाले, उर्स आणि शिवजयंतीनिमित्ताने हा घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. एखादा सण व उत्सव कशाप्रकारे साजरा करावा याचे हे आदर्श उत्तम उदाहरण आहे. ग्रामीण भागातील महिला दुखणे अंगावरच काढतात. त्यामुळे असे शिबीर घेवून त्यात महिलांच्यात जाणीव जागृती करणे, आरोग्याची सुविधा उपलब्ध करणे ही आजच्या काळात फार महत्वाची बाब आहे. भविष्यातही आपण सामाजिक उपक्रम राबवावेत जेणेकरून समाजाला त्याचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले. तहसीलदार अनंत गुरव म्हणाले, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम या कार्यक्रमातून होत आहे ही फार मोठी बाब आहे. महिलांच्या शिबिरामुळे सर्वधर्मिय एकत्रित आल्याचे समाधान आहे. समाजातील वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी काही तरी करण्याची भूमिका हीच प्रेरणा व बळ देणारी आहे.
प्रास्ताविकात हजरत खलील चिश्ती यांनी आपण वेगवेगळ्या धर्माचे पंताचे जरी असेल तरी आपण सर्व मनुष्य आहोत. आपण धार्मिकता जपताना सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. लोकांनी आपले विचार, आचार आणि नितिमत्ता साफ ठेवली तर आपले आणि आपल्या समाजाचे भलं होइल. आपण कोणत्या जातीपातीचे आहोत यापेक्षा आपण माणूस आहोत हे पहिला लक्षात घ्या. आपण जातीधर्माच्या रेषेबाहेर जाऊन माणसाने माणसाशी माणसासारखे राहिले पाहिजे, असे सांगितले.
  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महिला आरोग्य शिबिरास प्रारंभ करण्यात आला. या शिबिरात जवळपास आठशे महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. मोफत औषध उपचार, तक्रार निवारण व मोफत हिमोग्लोबिन, बीपी, शुगर तपासणी करण्यात आली.
पीर हजरत शेख मोहम्मद खलील चिश्ती यांनी प्रास्ताविक केले. तबसुम शेख यांनी स्वागत केले. विद्या म्हासुर्णेकर यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. कार्यक्रमास नगरपंचायतीच्या सर्व नगरसेविका, शहरातील मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement