Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मेंढोशी येथील बाळु गणपती जाधव यांचे निधनाने, वटवृक्ष कोसळला..

       पाटण - पाटण तालुका आणि सह्याद्रीच्या कडे कपारी यांचे जीवाभावाचे नाते आहे. जसं माउलीच्या कुशीत बाळ खेळत असतं.. अगदी तसंच सह्याद्रीच्या कुशीत पाटण तालुका वसलेला आहे. इथले जीवनमान डोंगराळ, खडतर असले तरी संपूर्ण तालुका सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. सह्याद्रीच्या कडे कपारींनी या तालुक्यात अनेक खोरी निर्माण झालेली आहेत. कोयना, ढेबेवाडी, पाटण, चाफळ, तारळे.. आणि आणि डोंगर पठारावर, कडे कपारीत वसलेल्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्या हा पाटण तालुक्याचा भूगोल. 
     पाटण खोऱ्यात तालुक्यापासून जवळच असलेल्या केरा विभागातील मेंढोशी हे आमचे छोटेसे गाव. या गावातील सर्वात जुना वृक्ष कोसळला, त्या निमित्ताने चार शब्द..
पारतंत्र्य, स्वातंत्र्याचा लढा आणि त्यानंतर उगवलेली स्वातंत्र्याची पहाट.. आणि त्यानंतर ही पाऊनशे वर्षे स्वातंत्र्याची अनुभूती घेतले आमच्या मेंढोशी गावातील जेष्ठ, श्रेष्ठ, वयोवृद्ध नागरिक बाळू गणपती जाधव यांनी आपल्या प्रदीर्घ वाटचालीला पूर्णविराम दिला. 
     १९१४..! म्हणजे तब्बल १०९ वर्षे! आजही आमच्या तालुक्याला 'दुर्गम' ही बिरुदावली जळवासारखी चिकटलेली आहे. मग १०९ वर्षांपूर्वी इथली परिस्थिती काय असेल? पहावे तिकडे घनदाट जंगल, जंगली हिंस्र प्राण्यांचा सुळसुळाट, इंग्रजांचा जुलूम, सुखस्त संसाधनांचा अभाव.. आणि त्यानंतर परिस्थिती ने घडविलेला बदल.. या सगळ्या स्थित्यंतराचा साक्षीदार त्यांच्या पूर्णविरामाने हरपला. माझं मन हळहळलं. त्यांच्या मृत्यूने नाही.. एवढ्या प्रदीर्घ स्थित्यंतराचा एकमेव साक्षीदार, आठवणींचा प्रचंड खजिना काळाच्या उदरात लूप्त झाला याचे अपरिमित दुःख झाले. 
     सुख सुविधांचा, सुखद संसाधनांचा जराही स्पर्श न झाल्यामुळे नैसर्गिक, सदृढ प्रकृती. सकस आहार आणि सकस जगण्यामुळे त्यांना कोणताही आधुनिक आजार चिकटला नाही. अखेरपर्यंत धडधाकट जगले. 
सफेद धोतर, सफेद सदरा आणि डोक्यावर लाल फेटा असा पेहेराव असलेले आप्पा समाजाभिमुख व्यक्तीमत्व होते. तालुक्याच्या ठिकाणी कोर्ट कचेरी किंवा कोणत्याही कामात अडल्या नडल्यांना सहकार्य करणारे आप्पा.. कुणीही आवाज दिल्यावर तयार होऊन त्यांच्यासोबत तालुक्याला जाऊन त्यांच्या समस्या, अडचणींचा निपटारा करणारे आप्पा. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा नव्हत्या.‌ दुर्गम भागात कष्ट करणाऱ्या माणसांना एखादा आजार झाल्यास, काही दुखापत झाल्यास इलाज कोण करणार? आप्पांनी आपल्या आजुबाजूला असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा, वनस्पतींचा अभ्यास करून अनेक आजारावर औषधे शोधून काढली होती. अनेक रुग्णांना त्यांनी झाडपाल्याच्या औषधाने बरे केले. ते तज्ञ हाडवैद्य देखील होते. हाड सरकणे, लचकणे, मुरगळणे या व्याधींवर औषधोपचार आणि मॉलिश करून कित्येक रुग्णांना त्यांनी बरे केले. आपल्याकडे सुविधा नाहीत म्हणून गप्प बसणारे आप्पा नव्हते. संसाधनांचा अभाव असला तरी त्यावर उपाययोजना शोधण्याच्या आणि समाजशील वृत्तीमुळे ते केवळ मेंढोशी नाही.. संपूर्ण विभागात सुपरिचित होते. विभागातील सर्व लोक त्यांचा आदर करीत असत. 

त्यांच्या वयाच्या १०४ व्या वर्षी त्यांची पत्नी ताईबाई या वृद्धापकाळाने त्यांची साथ सोडून गेल्या. मात्र मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे, प्रत्येकाला एक दिवस श्वास सोडावाच लागतो. जीवनाचे हे कटू सत्य ओळखलेल्या आप्पांनी आणखी पाच वर्षे खंबीरपणे, स्वबळावर, कुणाचाही आधार न घेता जीवन जगले. तीन मुले आणि एक मुलगी अशी त्यांची अपत्ये.. त्यातील एक मुलगा आणि एक मुलगी अल्पशा आजाराने यापूर्वीच मृत्यू पावले आहेत.  
      १०९ वर्षे म्हणजे आजच्या काळात एवढे जगण्याचा कुणी विचारही करू शकत नाही. आजच्या काळात पन्नाशीतच माणसं वार्धक्याने, अनेक महागड्या आजारांनी बेजार होतात. मात्र एवढा प्रदीर्घ कालावधी निरंक, निष्कलंक, स्वच्छ जीवन जगलेले आप्पा.. आपल्या आजुबाजूच्या लोकांना केवळ सावली आणि तसेच जगण्याची प्रेरणा देणारा वटवृक्ष होते. शनिवार दिनांक १३ मे २०२३ रोजी हा वटवृक्ष कोसळला. त्यांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण परिसर हळहळला. मात्र त्यांनी निर्माण केलेल्या सावलीत वाढलेल्या आम्हाला ते सदैव स्मरणात राहतील.. प्रेरणा देत राहतील. 

     आप्पांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. संपूर्ण पाटील परिवार, आप्तेष्ट, मित्र, ग्रामस्थ, परिवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली!
 श्री. मारुती पाटील (मेंढोशी) 
सेवानिवृत्त मुंबई अग्निशमन दल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement