Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


सुलोचना दीदी पंचतत्वात विलीन. शासकिय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार.

            सर्व छायाचित्रे  - संजय डुबल
मुंबई - संजय डुबल
- जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (दीदी) यांचे दि. 4 रोजी दादर येथील हाॕस्पीटल मध्ये निधन झाले. आज सुलोचना दीदी यांच्या प्रभादेवी येथे राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
    त्यांचे निधनाची बातमी समजताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,'सुलोचनाजींच्या निधनामुळे भारतीय चित्रपट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे आपली संस्कृती समृद्ध झाली आहे आणि रसिकांच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्यावर प्रेम केले आहे.त्यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना. ओम शांती.
        राज्यशासनाच्या वतीने सुलोचना दीदींना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले," सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली ‘आई’ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली".      
       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलोचना दीदींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आहे. सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 
     दरम्यान आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर, राजदत्त,  सतिष रणदिवे, विजय खोचीकर, चैत्राली डोंगरे, संजीव नाईक, सुषांत शेलार, सुबोध भावे, आशा काळे, प्रिया बेर्डे, सोनाली कुलकर्णी ( सिनियर), आदेश बांदेकर, महेश कोठारे, जॅकी श्राॅफ, किरण शांताराम, मनवा नाईक, अभिजित देशपांडे, विनय नेवाळकर, अभिजित केळकर, 
अभिजित देशपांडे,  निखिल साने, अजित भुरे, प्रसाद कांबळी, अशोक सवने, नाटककार  व नाट्यसमिक्षक सु. बा सरपडवळ, रमेश साळगावकर, संजय डुबल, विशाल पवार तसेच अनेक मान्यवरांनी सुलोचना दीदी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.           
       त्यानंतर शासकीय इतमामात दादर येथील स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार झाले. 
       चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी सुलोचना दीदींना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. प्रपंच चित्रपटासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (१९६३), संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार (१९६८) दीदींना मिळाला होता. तसंच महाराष्ट्र शासनाचा ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ (१९९७), केंद्र शासनातर्फे ‘पद्मश्री’ (१९९९), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘चित्रभूषण’ पुरस्कार (२००३), महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ (२०१०) अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरव्यात आलं आहे.
      सुलोचना दीदी यांच्या अंत्यसंस्कारा वेळी नातेवाईक तसेच मराठी, हिंदी चित्रपट क्षेत्रातील व विविध मान्यवर उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement