Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


नाट्य क्षेत्रातील नवा तरुण विक्रमवीर"लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद...सलग १२ प्रयोग करून (विक्रमार्जुन) आकाश भडसावळेने केला नवीन विक्रम!

नाट्य क्षेत्रातील नवा तरुण विक्रमवीर

"लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद...

सलग १२ प्रयोग करून (विक्रमार्जुन) आकाश भडसावळेने केला नवीन विक्रम!

मुंबई -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (गणेश तळेकर ) : मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अतूट नातं आहे. महाराष्ट्राला नाटकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. नाट्यक्षेत्रामध्ये यापूर्वी काही विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. अनेक प्रथितयश अभिनेते, संस्था किंवा त्यांच्या नाटकांच्या नावाने त्यांची नोंद घेतली गेली आहे. नाट्यक्षेत्रात विक्रम करण्याचा प्रथम मान अभिनेता प्रशांत दामले यांचा. त्यांनी आपल्या नावे लिम्का बुक मध्ये काही विक्रम नोंदविले आहेत. त्यानंतर अनेकांनी समांतर विक्रम केले, त्यात नाटकांच्या नावाने केलेल्या विक्रमांची संख्या जास्त आहे. आकाश भडसावळे यानेही एकाच दिवसात सलग १२ प्रयोगांचा नवीन विश्वविक्रम रविवार दि. ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी पूर्ण केला. या विक्रमाची नोंद २०२४ च्या "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये करण्यात आली आहे. 'करनाटकू' संस्थेची निर्मिती आणि प्रसिद्ध व्यावसायिक निर्मिती संस्था 'अभिजात' च्या पाठिंब्याने ठाणे आणि मुलुंड येथे हे यशस्वी प्रयोग सादर झाले. यावेळी एकूण ३ नाटकांचे प्रत्येकी ४ असे १२ प्रयोग सादर केले गेले. योगेश सोमण लिखित सस्पेन्स 'टेलिपथी', सुयश पुरोहित लिखित-दिग्दर्शित ब्लॅक कॉमेडी 'मरणोत्पात' आणि इरफान मुजावर लिखित 'अस्थिकलश' अशा वेगवेगळ्या आशयाच्या एक अंकीय नाटकांचे प्रत्येकी १ तास असे १२ प्रयोग सादर करण्यात आले. हे प्रयोग १५.५ तासांत त्याने केले; पैकी प्रथम ६ प्रयोग हे सलग म्हणजे सकाळी ८ ते २ या वेळेत त्याने सादर केले. उर्वरित प्रयोग ३ प्रयोगांच्या टप्प्याने २ भागांत केले; ज्यात आधीच्या नाट्यगृहातून दुसऱ्या नाट्यगृहात जाण्याचाच कालावधी फक्त अधिक घेतला गेला. हे प्रयोग करताना मंचाच्या रचनेतही बदल असलेल्या भिन्न अशा नाट्यगृहांचाही समावेश होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे नाटकांचे 'प्रयोग' होते असे म्हणता येईल.

अभिनेता आकाश भडसावळे त्याच्या चरित्र भूमिकांसाठी ओळखला जातो. 'होय मी सावरकर बोलतोय' नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर, कै. विश्राम बेडेकर लिखित प्रसिद्ध नाटक 'टिळक आणि आगरकर' मधील सुधारक गोपाळ गणेश आगरकर अशा त्याच्या काही गाजलेल्या चरित्र भूमिका आहेत. 'वासूची सासू' हे त्याचे विनोदी नाटक रंगभूमीवर तुफान गाजते आहे; ज्यात (पद्मश्री) नयना आपटे, विनोदवीर अंकुर वाढवे अशी कलाकार मंडळी काम करित आहेत. पूर्वी दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेली नाटकातील अण्णांची भूमिका स्वतः आकाश भडसावळे करित आहे. तसेच सध्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय ' या नाटकात आकाश 'महात्मा गांधींजींची' भूमिका साकारतोय. तत्पूर्वी 'सागरा प्राण तळमळला' या नाटकात त्याने क्रांतिवीर बाबाराव सावरकर (गणेश दामोदर) यांची भूमिका उत्तमरित्या पेलली होती.

चरित्र भूमिकेसाठी आकाश ओळखला जात असला तरीही त्याने अनेक संगीत नाटके, सामाजिक नाटके केली आहेत. विनोदी नाटकातही त्याची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. खऱ्या अर्थाने विविध भूमिका पेलणारा आकाश नाटकवाल्यांसाठी धावून जाणारा आणि सामाजिक भान असलेला अभिनेता आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला गतवर्षी आकाशने मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी ३ क्रांतिकारी नाटकांचा महोत्सवही केला होता ज्याला अतुल परचुरे, कुमार सोहोनी, योगेश सोमण यांची हजेरी होती. यावेळी काही दिग्गज कलाकारांचा सत्कारही करण्यात आला होता. अभिनयाची जाण असणारा आकाश दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही कार्यरत आहे. वासूची सासू हे नाटक त्याच्या 'सवाईगंधर्व' संस्थेचे असून नाट्य निर्मिती आणि सांगीतिक कार्यक्रम या क्षेत्रात 'सवाईगंधर्व' उल्लेखनीय काम करते आहे. अनेक अभिनय स्पर्धांसाठी परीक्षक म्हणूनही त्याने काम केलेले आहे.

आकाशने केलेला हा नवा विश्वविक्रम अनेक तरुण रंगकर्मी आणि अभिनेत्यांना नक्कीच आश्वासक आहे. या विक्रमाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या सोबत असलेल्या कलाकारांची दिवस रात्रीची मेहनत यामुळेच हा विश्वविक्रम करता आल्याचे आकाश भडसावळे याचे म्हणणे आहे. या प्रयोगांचे व्यवस्थापन राकेश तळगावकर आणि सुरेश भोसले यांच्याकडे होते.

एक अंकीय नाट्य प्रकारात विक्रम करणारा आकाश भडसावळे हा महाराष्ट्रातील एकमेव अभिनेता आहे. मराठी माणसांची आणि नाट्य क्षेत्रातील प्रतिभावंत रंगाकर्मींची मान अभिमानाने उंचावणारा हा विश्वविक्रम आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement