धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर सर्वच परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. छोट्या नद्या, नाले, ओढ्यांमधून प्रतिसेकंद सरासरी ३७,७७७ क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने धरण पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. धरणाचे दरवाजे नऊ फूट वर उचलण्यात आले असून यातून ४० हजार तर पायथा वीजगृहातील २० मेगॅवॅट क्षमतेच्या दोन्ही जनित्रांद्वारे ४० मेगॅवॅट वीजनिर्मिती करून २,१०० असे प्रतिसेकंद ४२,१०० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता ८५.४४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे १९.८१ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
धरणात सध्या ८५.४४ टीएमसी उपलब्ध तर ८०.३२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून मागील चोवीस तासात धरण पाणीसाठ्यात ०.४५ टीएमसीने तर पाणी उंचीत ६ इंच वाढ झाली आहे. सोमवार संध्याकाळी पाच ते मंगळवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात कोयना ९४ मिलिमीटर, नवजा ११३ मिलिमीटर, तर महाबळेश्वर १२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


0 टिप्पण्या